सिल्लोड, (प्रतिनिधी) : शहरातील आंबेडकर चौक व अण्णाभाऊ साठे चौक येथील दोन दुकानांना बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले.
बस सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर स्थानकालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातील सत्यम चौबे यांच्या मालकीचे श्री मेडिकल या दुकानात बुधवारी रात्री अकरा वाजता आग लागली. यादरम्यान काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर असल्याने ही आग तात्काळ लक्षात आली. परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने आग ताबडतोब आटोक्यात आली या दरम्यान श्री मेडिकल यांच्या मालकीचे फ्रीज पूर्णपणे खाक झाले. या आगीत त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सत्यम चौबे यांनी सांगितले.
दुसरी घटना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रात्री दीड वाजता घडली. या ठिकाणच्या मालक वडापाव या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानात असलेल्या गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या आगीत दुकानदाराचे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक विनोद वाघ यांनी सांगितले. दरम्यान, ही भीषण आग नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे वाहन तत्काळ आल्याने आग आटोक्यात आणली व त्यामुळे मोठा अनर्थ टळला.














